आता कला आणि वाणिज्य विद्यार्थ्यांना पायलट होण्याची संधी
मुंबई /प्रतिनिधी
अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं पायलट बनण्याचं, पण सध्या फक्त विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना पायलट बनण्याची संधी मिळते. यामुळे अनेकांचे स्वप्न साकार होत नव्हतं. परंतु आता आर्ट्स आणि कॉमर्स विद्यार्थ्यांना देखील पायलट बनण्याची संधी मिळणार आहे.
आत्तापर्यंत पायलट प्रशिक्षणासाठी १२वीत भौतिकशास्त्र (Physics) आणि गणित (Maths) असणं अनिवार्य होतं. त्यामुळे आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी पायलट बनणं अवघड होतं. मात्र, नागरिक उड्डयन महासंचालनालय (DGCA) आता कमर्शियल पायलट लायसन्स (CPL) प्रशिक्षणासाठीचे पात्रता निकष शिथिल करण्याचा विचार करत आहे.
लवकरच या नियमात बदल होण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळे आर्ट्स आणि कॉमर्स पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना देखील पायलट बनण्यासाठी प्रशिक्षण घेता येईल.
या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या पायलट होण्याच्या स्वप्नाला नवे पंख मिळणार आहेत. तथापि, वैद्यकीय निकष आणि इतर तांत्रिक चाचण्या यापुढेही आवश्यक राहतील.
वैद्यकीय फिटनेस मानकांचे पालन करणे अनिवार्य
नागरिक उड्डयन महासंचालनालय (DGCA) च्या या निर्णयामुळे सर्व विद्यार्थ्यांना मोठा फायदा होऊ शकतो, ज्यांनी ११वी, १२वी मध्ये विज्ञान घेतले नाही, परंतु पायलट बनून विमान उडवण्याचे स्वप्न पाहिले आहे. जरी आता आर्ट्स आणि कॉमर्स पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना पायलट प्रशिक्षण घेता येईल, तरीही त्यांच्यासाठी महत्त्वाचे म्हणजे डीजीसीएच्या वैद्यकीय फिटनेसचे पालन करणे आवश्यक राहील.
कधी लागू झाला होता विज्ञानाच्या अनिवार्यतेचा नियम ?
पायलट प्रशिक्षणाला सामान्यतः खूप कठीण मानलं जातं, कारण यासाठी तांत्रिक ज्ञान आवश्यक असतं. त्यामुळे १९९० च्या दशकात भारतात पायलट होऊ इच्छिणाऱ्यांसाठी १२वीत भौतिकशास्त्र (Physics) आणि गणित (Maths) अनिवार्य करण्यात आले.
यामुळे आर्ट्स आणि कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठी पायलट बनण्याचे स्वप्न फक्त स्वप्नच राहिले होते. असा नियम लागू होण्यापूर्वी, कमर्शियल पायलट लायसन्स ट्रेनिंग सुरू करण्यासाठी १०वी उत्तीर्ण असणेच पुरेसं होतं.
नवीन नियम अंतिम टप्प्यात आहेत
सद्याच्या माहितीनुसार, डीजीसीए हा नवीन नियम अंतिम स्वरूपात तयार करतो आहे, आणि लवकरच या नियमाला केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवले जाईल. मंजुरी मिळाल्यावर, भारत त्या देशांच्या यादीत समाविष्ट होईल, जिथे सीपीएल ट्रेनिंगसाठी भौतिकशास्त्र आणि गणित अनिवार्य नाहीत.
