स्वामी चिंचोली – राजेगाव मुख्य रस्त्यावरील साईट पट्या पावसाने वाहिल्या, अपघातांचा धोका वाढला
राजेगाव / प्रतिनिधी
स्वामी चिंचोली ते राजेगाव या मुख्य रस्त्यावरील साईट पट्या पावसामुळे पूर्णपणे वाहून गेल्या असून या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते. मात्र, रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षणासाठीच्या साईट पट्ट्या नष्ट झाल्याने वाहनचालकांसमोर अपघाताचे गंभीर संकट उभे राहिले आहे.
या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार केला असून, तोंडी देखील अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
विशेष म्हणजे, साईट पट्या तुटल्यामुळे रस्त्याच्या कडेला मोठी दरी उघड झाली आहे. पावसाळ्याच्या काळात दृष्यमानता कमी असल्याने किंवा रात्रीच्या वेळी रस्ता नीट दिसत नसल्यामुळे वाहनचालक थेट या दरीत कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी आधीच किरकोळ अपघात झाले असल्याची माहितीही समोर आली आहे.
स्थानिक प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. ‘रस्ते बांधताना दर्जा पाळण्यात आला नाही का?’ असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. वेळेवर दुरुस्ती न झाल्यास याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.
यासंदर्भात संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून साईट पट्यांची दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे. नागरिकांचे प्राण धोक्यात घालणाऱ्या या अक्षम्य दुर्लक्षिततेमुळे भविष्यात गंभीर अपघात घडल्यास त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर असेल, हेही प्रशासनाने लक्षात घ्यावे.
सार्वजनिक बांधकाम विभागतील
अधिकाऱ्याच्या चुकीच्या कामामुळे रस्त्याच्या साईट पट्या वाहून गेल्या आहेत. या विभागाकडून विविध नहरकत प्रमाण पत्र देण्यात आल्याने ठेकेदार यांनी रस्त्याच्या कडेला खोदकामं केले आहे. त्यामुळे रस्ता वाहून गेला आहे. याला जबाबदार समंधित सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीकारी जबाबदार आहेत. यांच्याकडून या कामाची वसुली रक्कम समंधित अधिकारी यांच्यावर बसवण्यात यावी असे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री यांना देणार आहे
(मा. सरपंच-अझरुद्दीन शेख)
