विकासकामे की गैरव्यवहार? इंदापूर पंचायत समितीतील शाखा अभियंता दाऊद शेख वादाच्या भोवऱ्यात
इंदापूर/ प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागातील शाखा अभियंता दाऊद शेख यांच्या कार्यक्षेत्रात झालेल्या नित्कृष्ट दर्जाच्या कामांबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या भुमिगत गटार व पाणीपुरवठा (जलजीवन) कामांमध्ये शासन नियमांना (इस्टिमेट)बगल देत अत्यंत सुमार दर्जाचे साहित्य वापरून नित्कृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत कालठाण नं. १ येथील भुमिगत गटार योजनेत कमी खोलीवर टाकलेले पाईप, पाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था नसणे, तसेच दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे कृत्य अनुसूचित जातीतील नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी केल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्ते दत्ता जगताप यांनी केला आहे.
इंदापूर पंचायत समिती शाखा अभियंता दाऊद शेख यांच्या कार्यक्षेत्रातील कामांची चौकशी करून त्यांच्यावरती तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात यावी. कारवाई न झाल्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या केबिनमध्ये बोंबाबोंब आंदोलन छेडले जाईल असे दत्ता जगताप यांच्या वतीने सांगण्यात आले.
या प्रकरणी शाखा अभियंता दाऊद शेख व संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व भ्रष्टाचार विरोधी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच नित्कृष्ट कामांची चौकशी करून शाखा अभियंता दाऊद शेख यांच्या कार्यक्षेत्रातील जलजीवन योजना तसेच अंडरग्राउंड गटर लाईन काँक्रिटीकरण रस्ते यासह इतर सर्वच कामांचे चौकशी करून त्यांच्यावरती तात्काळ बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात यावी. यासह इतर मागण्यांचे निवेदन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मुख्य सचिव ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.पुणे, गटविकास अधिकारी इंदापूर यांना देण्यात आले आहे. सदर व्यक्तींवर कारवाई न झाल्यास आम्ही आंदोलन करू असे दत्ता जगताप यांचे वतीने सांगण्यात आले आहे. तसेच शासनाचा अपव्यय केलेली रक्कम वसूल करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

