इतरइंदापूर

कर्मयोगी सुभाषआण्णा कुल पतसंस्थेच्या सभापतीपदी बापुराव खळदकर तर उपसभापती पदी महादेव बंडगर यांची निवड.

Spread the love
भिगवन /प्रतिनिधी
दौंड तालुक्यातील सर्वसामान्य शिक्षक बांधवांची जीवनदायिनी असलेल्या कर्मयोगी सुभाषआण्णा कुल प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री बापूराव चंद्रकांत खळदकर तर उपसभापती पदी श्री. महादेव बंडगर यांची निवड करण्यात आली.
सभापती पदासाठी बापुराव चंद्रकांत खळदकर आणि बाळासाहेब त्रिंबक थोरात या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. संपूर्ण प्रक्रिया बिनविरोध होण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करूनही त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. त्यामुळे गुप्त मतदान घेण्यात आले . त्यामध्ये बापुराव खळदकर यांना ११ मते मिळाली तर बाळासाहेब थोरात यांना ३ मते मिळाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी खळदकर यांना विजयी घोषित केले. उपसभापती पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने श्री. महादेव श्रीमंत बंडगर यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. शिंदे व शितोळे यांनी कामकाज पाहिले.
निवडीनंतर भीमा पाटस साखर कारखान्याचे संचालक विकास शेलार, शिक्षक नेते शांताराम जगताप,शिक्षक समितीचे नेते राजुभाई आत्तार आणि सर्व संघटनांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित सभापती,उपसभापती यांनी सर्वांना सोबत घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक हिताचा कारभार करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले आणि सर्व संघटनांचे व संचालक मंडळाचे आभार व्यक्त केले.
सभापती बापुराव खळदकर हे दौंड तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष आहेत.तर महादेव बंडगर यांनीही दौंड तालुका जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण कोल्हे यांनी केले तर राजुभाई आत्तार यांनी आभार मानले.
आमदार राहुल कुल यांच्या सूचनेनुसार २०२४ मध्ये संस्थेची पंचवार्षिक निवडणुक सर्व संघटनांना प्रतिनिधित्व देत बिनविरोध करण्यात आली होती. त्यावेळी शांताराम जगताप आणि शंकर भुजबळ यांची सभापती, उपसभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली होती.यावेळी मात्र सभापती पदासाठी सर्व संघटनांनी बापुराव खळदकर यांना सर्वानुमते पाठिंबा दिलेला असतानाही शिक्षक समितीच्या अध्यक्षांच्याच उमेदवारी विरोधात तीन संचालकांनी बंडाचा झेंडा उभारत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने समितीमध्ये उभी फूट पडल्याचे दिसून आले.त्यामुळे पतसंस्थेचे भविष्यातील राजकारण वेगळे वळण घेण्याची शक्यता आहे.त्यामुळे सर्व संचालकामध्ये ही या प्रकाराबाबत नाराजी दिसून आली. भीमा पाटसचे संचालक विकास शेलार यांनीही नाराजी व्यक्त करीत याबाबत अध्यक्ष म्हणून बापुराव खळदकर यांनी कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *