रुग्णालयांमध्ये ‘रुग्ण हक्क सनद’ लावा; सुधाकर बोराटे यांची मागणी!
इंदापूर तालुक्यातील सरकारी व खासगी रुग्णालयांना १५ दिवसांची मुदत; मागणी पूर्ण न झाल्यास २ डिसेंबरला तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन;

भिगवण : प्रतिनिधी
रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आपल्या हक्कांची, मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधांची तसेच उपचारांच्या खर्चाची स्पष्ट माहिती मिळणे आवश्यक आहे. याच उद्देशाने इंदापूर तालुक्यातील सर्व सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये शासनमान्य सुधारित ‘रुग्ण हक्क सनद’ दर्शनी भागात लावण्यात यावी, अशी ठाम मागणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे इंदापूर तालुकाप्रमुख सुधाकर बोराटे यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी आरोग्य विभागाला १५ दिवसांची मुदत दिली असून, निर्धारित कालावधीत कार्यवाही न झाल्यास २ डिसेंबर २०२६ रोजी इंदापूर तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात सोमवार, दि. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सिद्धार्थ नामपल्ले आणि प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ओंकार हेंद्रे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन देण्यात आले. इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रातील तसेच संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण भागातील खासगी रुग्णालयांमध्येही या नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
रुग्णांना त्यांच्या हक्कांची माहिती मिळणे आवश्यक
अनेकदा रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना रुग्णालयात उपचार घेताना कोणत्या सुविधा मिळणे अपेक्षित आहे, उपचारांचे दर काय आहेत, तक्रार कोठे आणि कोणाकडे करायची, याची पुरेशी माहिती नसते. त्यामुळे रुग्णालयाच्या दर्शनी भागात रुग्ण हक्क सनद, उपचारांचे दरपत्रक, तालुका व जिल्हास्तरीय तक्रार निवारण अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक तसेच रुग्णालयाचे वैध नोंदणी प्रमाणपत्र लावणे गरजेचे आहे.
यामुळे रुग्ण आणि रुग्णालय प्रशासन यांच्यातील व्यवहार अधिक पारदर्शक होतील. तसेच रुग्णांना त्यांच्या अधिकारांची जाणीव होऊन वैद्यकीय सेवांबाबत योग्य माहिती मिळण्यास मदत होईल, असे सुधाकर बोराटे यांनी स्पष्ट केले.
इंदापूर शहरातील नऊ रुग्णालयांना प्रत्यक्ष भेट
केवळ प्रशासनाकडे निवेदन देऊन न थांबता सुधाकर बोराटे यांनी त्याच दिवशी इंदापूर शहरातील नऊ रुग्णालयांना प्रत्यक्ष भेट देऊन रुग्ण हक्क सनद व आवश्यक नियमांची माहिती संबंधित डॉक्टरांना दिली. यामध्ये डॉ. अभिजित ठोंबरे, डॉ. अविनाश पाणबुडे, डॉ. मनोज वाघमोडे, डॉ. अमोल रासकर, रोहन हेगडे, डॉ. सागर दोशी, डॉ. शिवाजीराव खबाले, डॉ. उदयसिंह फडतरे आणि डॉ. मनोजकुमार शिंदे यांच्या रुग्णालयांचा समावेश आहे.
संबंधित रुग्णालयांना आवश्यक माहितीची प्रत देऊन शासनाच्या सुधारित नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच इंदापूर शहरातील उर्वरित रुग्णालयांनाही पुढील दोन दिवसांत निवेदने देण्यात येणार असल्याचे बोराटे यांनी सांगितले.
१५ दिवसांत कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन अटळ!
तालुक्यातील सर्व रुग्णालयांनी १५ दिवसांच्या आत आवश्यक माहिती फलक दर्शनी भागात लावावेत. प्रशासनानेही या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी होते की नाही, याची तपासणी करावी. दिलेल्या मुदतीत अपेक्षित कार्यवाही झाली नाही, तर २ डिसेंबर २०२६ रोजी इंदापूर तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा सुधाकर बोराटे यांनी दिला आहे.
रुग्णांचे हक्क सुरक्षित राहावेत, वैद्यकीय सेवांमध्ये पारदर्शकता यावी आणि सामान्य नागरिकांना उपचारांबाबत कोणतीही अनावश्यक अडचण निर्माण होऊ नये, यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. आता आरोग्य विभाग या मागणीची कितपत दखल घेतो आणि तालुक्यातील रुग्णालयांमध्ये रुग्ण हक्क सनद प्रत्यक्षात कधी झळकते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

