कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील!
उपाध्यक्षपदी छगन भोंगळे यांची बिनविरोध निवड; सलग चौथ्यांदा हर्षवर्धन पाटील यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा!
भिगवन| प्रतिनिधी
दि. १३ नोव्हेंबर २०२६
महात्मा फुलेनगर-बिजवडी (ता. इंदापूर) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी छगन भोंगळे यांची बिनविरोध निवड गुरुवारी (दि. १२) करण्यात आली.
या कारखान्याची सन २०२६ ते २०३१ या कालावधीची पंचवार्षिक निवडणूक हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच बिनविरोध पार पडली. कारखान्याची ही सलग दुसरी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यानंतर कारखान्याच्या नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अध्यक्षपदासाठी हर्षवर्धन पाटील व उपाध्यक्षपदासाठी छगन भोंगळे यांचे प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाल्याने या निवडी बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. यशवंत माने यांनी केली.
यावेळी संचालक राजवर्धन पाटील, वसंत मोहोळकर, पराग जाधव, शांतीलाल शिंदे, रविंद्र सरडे, राकेश शुक्ला, निलेश देवकर, राजेंद्रकुमार देवकर, संतोष काळे, श्रीकांत देवकर, विजय खर्चे, रणजित निकम, रोहित गायकवाड, बिभिषण नलवडे, अतुल शिंगाडे, हरिश्चंद्र पारेकर, अमोल जाधव, रत्नमाला पवार व सुमन व्यवहारे उपस्थित होते.
या बिनविरोध निवडीनंतर नूतन अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व उपाध्यक्ष छगन भोंगळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचे कामकाज कर्मयोगी कारखाना व ओंकार शुगर अँड डिस्टिलरी यांच्या सहयोगातून चालविले जात आहे. शासनाच्या मान्यतेने हा सहयोगी करार करण्यात आला आहे. या कराराला एक वर्ष पूर्ण झाले असून आता दुसरे वर्ष सुरू आहे.
चालू सन २०२६-२७ चा गळीत हंगाम शुक्रवारपासून सायंकाळी पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. कारखान्याने गत हंगामासाठी प्रतिटन ३,३५० रुपये दर जाहीर केला असून, यामधील उर्वरित रक्कम प्रतिटन १५० रुपयांप्रमाणे येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल.
शेतकरी आणि कर्मचारी यांना केंद्रबिंदू मानून कारखान्याचे कामकाज केले जात आहे. कारखान्याचे कामकाज एकजुटीने व पक्षविरहित पद्धतीने केले जाईल. शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कर्मयोगी कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी केले.
सर्वपक्षीय नेत्यांचे मानले आभार
कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार पार्थ पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, यशवंत माने, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, प्रदीप गारटकर, प्रवीण माने, हनुमंतराव कोकाटे, अविनाश घोलप, तेजसिंह पाटील, अशोक घोगरे, डी. एन. जगताप आदींसह सर्वपक्षीय नेते, शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी, शेतकरी संघटना, कार्यकर्ते व सभासदांचे सहकार्य लाभले. विशेषतः दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
नूतन संचालक मंडळाचा सत्कार
यावेळी कारखान्याच्या बिनविरोध नूतन संचालक मंडळाचा ओमराजे बोत्रे-पाटील, लालासाहेब पवार, उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, अॅड. कृष्णाजी यादव, जयकुमार कारंडे, गोविंद रणवरे, अॅड. मनोहर चौधरी, पिंटू काळे, उत्तम जाधव, विक्रांत कोरटकर, मनोज मोरे, अशोक शिंदे, आबासाहेब शिंगाडे, सुरेश मेहेर, दादासाहेब घोगरे, किरण पाटील, महादेव शेंडगे, अंकुश पाडुळे, कार्यकारी संचालक विजय शिर्के व जनरल मॅनेजर रणजित तावरे आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक शरद काळे यांनी केले.

