शेटफळगडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील शासकीय औषध चोरीचा संशय!
रात्रीच्या वेळी औषधे व वैद्यकीय साहित्य बाहेर नेल्याचा ग्रामस्थांचा आरोप; माजी कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी
भिगवण | प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली शासकीय औषधे तसेच वैद्यकीय साहित्य परस्पर बाहेर नेल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आरोग्य केंद्रातील सेवा समाप्त झालेल्या एका माजी कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये सर्वसामान्य, गरीब व गरजू रुग्णांना मोफत औषधोपचार मिळावेत, या उद्देशाने शासनाकडून औषधांचा पुरवठा केला जातो. मात्र, याच औषधांचा गैरवापर होत असल्याचा संशय व्यक्त होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळी आरोग्य केंद्रातून औषधे व इतर वैद्यकीय साहित्य बाहेर नेले जात असल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. या फुटेजमध्ये रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत औषधे व वैद्यकीय साहित्य बाहेर नेले जात असल्याचे दिसून आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणात माजी कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या भूमिकेवरही संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, शासकीय मालमत्तेचा अशा प्रकारे गैरवापर होत असल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी केली आहे. तसेच आरोग्य केंद्रातील औषधसाठ्याची तपासणी, औषध वितरणाच्या नोंदींची पडताळणी आणि सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
चौकशी समिती नियुक्त; अहवालानंतर कारवाई
या गंभीर प्रकरणाची दखल जिल्हा परिषद सदस्या मेघनाताई बंडगर यांनी घेतली असून, चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कोणतीही कसूर न ठेवता योग्य ती कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दोषींवर फौजदारी कारवाईची भूमिका
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हुंकारे यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित कंत्राटी आरोग्य अधिकाऱ्याला ही घटना घडण्यापूर्वीच सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त केली असून, समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर तात्काळ कठोर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, एवढा गंभीर प्रकार समोर येऊनही अद्याप स्थानिक पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या चौकशीसोबतच पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेऊन सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शासकीय रुग्णालयातील औषधे ही जनतेच्या पैशातून उपलब्ध करून दिली जातात. त्यामुळे या औषधांचा गैरवापर किंवा अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. आता चौकशी समितीच्या अहवालातून नेमके सत्य काय समोर येते आणि आरोग्य विभाग दोषींवर कोणती कारवाई करतो, याकडे शेटफळगडे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

