इंदापूर बाजार समितीची चौदावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात
शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्याचे बाजार समितीचे धोरण — सभापती संदीप पाटील
भिगवण /प्रतिनिधी :
कृषी उत्पन्न बाजार समिती, इंदापूर या संस्थेची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाची चौदावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता समितीच्या मुख्य बाजार आवारातील डाळिंब मार्केट यार्ड येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती संदीप चित्तरंजन पाटील होते.
यावेळी बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था असून समितीत येणाऱ्या प्रत्येक शेतकरी व संबंधित घटकांना न्याय देण्यासोबतच शेतमालाच्या अनुषंगाने आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे धोरण असल्याचे सांगण्यात आले.
बाजार समितीच्या माध्यमातून भुसार, मासळी, फुले, डाळिंब, पेरू, कांदा, ड्रॅगन फ्रूट व सीताफळ या विविध बाजारपेठांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. मुख्य बाजार इंदापूर येथे शेतकरी निवास, उपबाजार भिगवण येथे आधुनिक शॉपिंग मॉल, धान्य सफाई यंत्र तसेच इंदापूर शहरातील मुख्य बाजार आवारात नवीन पेट्रोल पंप उभारण्याचे नियोजन असल्याची माहिती बाजार समितीचे मार्गदर्शक व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी दिली.
तसेच उपबाजार निमगाव-केतकी येथे नवीन पेट्रोल पंपाचे उद्घाटन महिनाभरात होऊन तो शेतकरी व संबंधित घटकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सन २०२५-२६ मध्ये बाजार समितीचे एकूण उत्पन्न ३ कोटी ८५ लाख रुपये झाले असून, बाजार फीच्या माध्यमातून १ कोटी ९१ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. तसेच बाजार समितीचा वाढावा ७५ लाख रुपये झाल्याची माहिती सभापती संदीप पाटील यांनी दिली.
यावेळी उपसभापती रुपालीताई संतोष वाबळे, माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, माजी आमदार यशवंत (तात्या) माने, संचालक विलासराव माने, दत्तात्रय फडतरे, मधुकर भरणे, तुषार जाधव, मनोहर ढुके, रोहित मोहोळकर, संग्रामसिंह निंबाळकर, मंगलताई झगडे, आबा देवकाते, संतोष गायकवाड, अनिल बागल, दशरथ पोळ, रोनक बोरा, सुभाष दिवसे तसेच इंदापूर तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अमोल भोईटे, व्हा. चेअरमन विष्णू देवकाते यांच्यासह संचालक, पदाधिकारी, शेतकरी व संबंधित घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेच्या शेवटी विष्णू देवकाते यांनी उपस्थितांचे आभार मानले.

