इतरइंदापूर

प्रजासत्ताक दिन संचलन पूर्व विद्यापीठस्तरीय निवड चाचणी शिबिरासाठी काजल गुळवेची निवड!

Spread the love
भिगवण, दि. १७ : प्रतिनिधी
कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, भिगवण ता. इंदापूर, जि. पुणे येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या स्वयंसेविका कु. काजल श्रीकृष्ण गुळवे, तृतीय वर्ष विज्ञान हिची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलन (NRD) पूर्व विद्यापीठस्तरीय निवड चाचणी शिबिरासाठी निवड झाली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मंगळवार दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे येथे राज्यस्तरीय व राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन पूर्व संचलन शिबिरासाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या निवड चाचणीमध्ये कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, भिगवणच्या कु. वैष्णवी पद्माकर शिंदे, कु. तनुजा विश्वनाथ मोहोळकर, कु. काजल श्रीकृष्ण गुळवे, कु. रूपाली रामदास हाके, कु. साक्षी सुरेंद्र घोरपडे आणि कु. प्रणाली मच्छिंद्रनाथ थोरात यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले.
या निवड प्रक्रियेतून कु. काजल श्रीकृष्ण गुळवे हिची विद्यापीठस्तरीय प्रजासत्ताक दिन संचलन पूर्व निवड चाचणीसाठी निवड करण्यात आली. तिच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
काजल गुळवे हिच्या निवडीसाठी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुणे ग्रामीण विभागाचे विभागीय समन्वयक डॉ. अनिल बनसोडे यांनी मार्गदर्शन व परिश्रम घेतले.
काजलच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तानाजी मगर यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे सचिव मा. ॲड. मनोहर चौधरी आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन पाटील यांनीही तिचे अभिनंदन केले.
काजल गुळवे हिच्या निवडीबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *