अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री; महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली – ॲड. शंकर चव्हाण
» नवी दिल्ली | वृत्तसंस्था :
ज्येष्ठ मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, अभिनय सम्राट अशोक सराफ यांना भारत सरकारने २०२४ सालचा प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार जाहीर करत त्यांच्या अमूल्य कलात्मक योगदानाचा गौरव केला. राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे पार पडलेल्या एका भव्य समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सराफ यांना हा नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.या विशेष प्रसंगी युवा नेतृत्व व मुंबई उच्च न्यायालयाचे ॲड. शंकर चव्हाण यांनी ट्विट करत अशोक सराफ यांचे अभिनंदन केले. “अशोक सराफ यांच्या पद्मश्री सन्मानामुळे संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. हा क्षण मराठी मनासाठी अत्यंत गर्वाचा आहे,” असे ॲड. चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. हास्य अभिनयातील अप्रतिम कौशल्य, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील प्रदीर्घ व बहुआयामी कारकीर्द, तसेच सहजतेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनय या सर्व बाबींमुळे अशोक सराफ यांना हा राष्ट्रीय सन्मान मिळाला आहे. त्यांनी गेली अनेक दशके ‘मराठी बाणा’ जपणाऱ्या आणि हसवणाऱ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. पुरस्कार सोहळ्यानंतर ANI ला दिलेल्या प्रतिक्रियेत अशोक सराफ म्हणाले, “ही एक आनंदाची गोष्ट आहे. पद्मश्री हा पुरस्कार मिळणं म्हणजे माझ्या आयुष्यातील एक मोठा गौरवाचा क्षण आहे. पुरस्कार जरा उशिरा मिळाला यावर माझं काही म्हणणं नाही. मिळाला, हीच माझ्यासाठी महत्वाची गोष्ट आहे.”ते पुढे म्हणाले, “हा पुरस्कार मिळाल्यामुळे जबाबदारी अजून वाढली आहे. मला विश्वास आहे की माझ्या प्रेक्षकांचे प्रेम आणि सहकार्य कायम असेच राहील.” या वर्षातील दुसऱ्या पद्म पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती होती. यामध्ये एकूण ६८ मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले.अशोक सराफ यांच्यासोबत त्यांच्या पत्नी व सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ, तसेच भाऊ सुभाष सराफ उपस्थित होते. त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पुरस्कार स्वीकृतीचे खास क्षण शेअर करत लिहिले, “हा सन्मान माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे. महाराष्ट्र शासन, माझे कुटुंबीय, सहकलाकार, आणि माझ्या प्रेक्षकांचे मी मनापासून आभार मानतो.” या पुरस्कारामुळे संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीत आनंदाचे वातावरण आहे. ‘मराठी अभिमान’ म्हणून ओळखले जाणारे अशोक सराफ हे खऱ्या अर्थाने मराठी मनोरंजन विश्वाचे स्तंभ आहेत. त्यांच्या कारकिर्दीने असंख्य कलाकारांना प्रेरणा दिली आहे आणि अजूनही ते नव्या पिढीच्या कलाकारांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत.