परिवहन मंत्र्यांच्या उद्घाटनानंतर भिगवण बसस्थानकाचे काम प्रतीक्षेच्या छायेत;
तीन-चार महिने उलटूनही बांधकामाला मुहूर्त नाही; प्रवाशांची गैरसोय, ग्रामस्थांमध्ये नाराजी
भिगवण, दि. १७ : प्रतिनिधी
भिगवण येथील बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन परिवहन मंत्र्यांच्या हस्ते झाल्यानंतरही प्रत्यक्ष बांधकामाचे काम अद्याप सुरू झाले नसल्याने प्रवासी व नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. उद्घाटन होऊन जवळपास तीन ते चार महिने उलटूनही बसस्थानकाच्या बांधकामाला सुरुवात न झाल्याने ‘उद्घाटन झाले, मात्र काम कधी सुरू होणार?’ असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
भिगवण हे पुणे-सोलापूर मार्गावरील महत्त्वाचे व मध्यवर्ती ठिकाण असल्याने या बसस्थानकावर दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची वर्दळ असते. मात्र सध्या बसस्थानकाची अवस्था अत्यंत गैरसोयीची झाली असून पावसाळ्यात प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बसस्थानक परिसरात अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य पसरले असून दुर्गंधीमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी परिसरात पुरेशा सुविधा नसल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या नागरिकांना विशेषतः अडचणींचा सामना करावा लागत आहे.
‘काम तातडीने सुरू करायचे नव्हते, तर जुने बसस्थानक पाडण्याची एवढी घाई का करण्यात आली?’ असा सवालही ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. उद्घाटनानंतर काम लवकर सुरू होईल आणि प्रवाशांना आधुनिक सुविधा मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात काम रखडल्याने नागरिकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले असल्याची भावना व्यक्त होत आहे.
भिगवण परिसरातून पुणे, सोलापूर, बारामती, इंदापूर तसेच इतर भागांत मोठ्या प्रमाणावर प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे बसस्थानकाचे बांधकाम लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन संबंधित प्रशासनाने या कामाची तातडीने दखल घ्यावी आणि बसस्थानकाच्या बांधकामाला त्वरित सुरुवात करून काम वेळेत पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थ व प्रवासी वर्गातून होत आहे.
दरम्यान, बसस्थानकाचे काम नेमके कोणत्या कारणामुळे रखडले आहे आणि ते कधी सुरू होणार, याबाबत प्रशासनाकडून स्पष्ट माहिती देण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.


