भिगवण पोलिसांची दमदार कामगिरी; १८ शेतकऱ्यांच्या केबल चोरीचा छडा,;
शेतकऱ्यांना दिलासा; आरोपी जेरबंद, १ लाख ७६ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत:
भिगवण, दि. १६ : भिगवण पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने शेतकऱ्यांच्या विद्युत पाणबुडी मोटारींच्या कॉपर केबल चोरी करणाऱ्या आरोपीस जेरबंद करून त्याच्याकडून तब्बल १ लाख ७६ हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीने यापूर्वी परिसरातील सुमारे १८ शेतकऱ्यांच्या केबल चोरी केल्याची कबुली दिल्याने या कारवाईमुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मदनवाडी, ता. इंदापूर येथील शेतकरी पांडुरंग मारुती बंडगर यांच्या शेतातील विहिरीमध्ये असलेल्या तीन पाणबुडी मोटारींना जोडलेल्या फिनोलेक्स कंपनीच्या निळ्या रंगाच्या सुमारे ७० मीटर केबलची चोरी झाली होती. या केबलची किंमत ११ हजार २०० रुपये होती. याप्रकरणी भिगवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.भिगवण परिसरात शेतकऱ्यांच्या पाण्याच्या विद्युत मोटारींच्या केबल चोरीच्या घटना वाढल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना केबल चोरीच्या घटनांमुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी शेतकऱ्यांशी संबंधित गुन्ह्यांचा सखोल तपास करून ते तातडीने उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती तसेच मदनवाडी येथील दक्ष नागरिकांच्या सहकार्याच्या आधारे पोलिसांनी टिंकु रामसेवक राजपूत (वय ३१, मूळ रा. नगला इमली, शाहपूर ब्राह्मण, आग्रा, उत्तर प्रदेश; सध्या रा. मदनवाडी, ता. इंदापूर) याला ताब्यात घेतले.पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरीस गेलेली कॉपर केबल पोलिसांच्या स्वाधीन केली. पुढील चौकशीत त्याने भिगवण परिसरातील आणखी सुमारे १८ शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींच्या कॉपर केबल चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.या कारवाईदरम्यान चोरीस गेलेल्या १८ शेतकऱ्यांच्या सुमारे १ लाख ७६ हजार २५० रुपये किमतीच्या कॉपर केबलचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अनेक दिवसांपासून केबल चोरीच्या घटनांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिरादार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, नाना वीर, पोलीस अंमलदार रामदास कर्चे, सचिन पवार, समीर झांबरे, सचिन भस्मे, शहाजी सुद्रीक तसेच मदनवाडी येथील दक्ष नागरिकांनी केली.गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार रामदास कर्चे करीत आहेत.

