मोठा आवाज करणाऱ्या वाहनचालकांना बारामती तालुका पोलिसांचा दणका!
नियमबाह्य सायलेन्सर वापरणाऱ्या २८ वाहनांवर कारवाई; २८ हजारांचा दंड, ७ सायलेन्सर जप्त
बारामती, दि. १५ : वार्ताहर
मोटारसायकलींना नियमबाह्य सायलेन्सर बसवून मोठा आवाज करत फिरणाऱ्या वाहनचालकांविरोधात बारामती तालुका पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. या विशेष मोहिमेत बुलेट, स्प्लेंडरसह विविध २८ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, तब्बल २८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच ७ नियमबाह्य सायलेन्सर पोलिसांनी जप्त केले आहेत.
शहरासह ग्रामीण भागात काही वाहनचालक आपल्या मोटारसायकलींना मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसवून वाहने चालवित असल्याचे निदर्शनास येत होते. या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असून, नागरिकांना विशेषतः ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि रात्रीच्या वेळी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर बारामती तालुका पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबवून अशा वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तपासणीदरम्यान नियमबाह्य सायलेन्सर बसविलेल्या वाहनांची पाहणी करून संबंधित वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे मोठा आवाज करणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.
यापुढेही कारवाई सुरूच राहणार वरिष्ठ सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण पवार
बारामती तालुका पोलिसांनी वाहनचालकांना आवाहन केले आहे की, मोटारसायकलीला नियमबाह्य सायलेन्सर बसवून मोठा आवाज करत वाहन चालवू नये. यापुढे अशा प्रकारचे वाहन आढळून आल्यास संबंधित वाहनचालकाविरुद्ध नियमानुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे.
वाहनचालकांनी कंपनीकडून वाहनाला उपलब्ध करून देण्यात आलेला अधिकृत सायलेन्सर वापरावा आणि वाहतूक नियमांचे पालन करावे. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन बारामती तालुका पोलिसांकडून करण्यात आले आहे.
अशा कामगिरीमुळे बारामती तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस सहायक निरीक्षक नारायण पवार सह त्यांच्या टीमचे ग्रामस्थांकडून विशेष कौतुक होत आहे,


