इंदापूरपुणे

इंदापूर तालुक्यातील १६ हॉस्पिटलची नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात;

Spread the love
चौकशीचे आदेश.
 जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश;
 शैक्षणिक पात्रता, नोंदणी कागदपत्रांची पडताळणी होणार

भिगवण :  प्रतिनिधी 

इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या १६ रुग्णालयांच्या नोंदणी अथवा नूतनीकरणाच्या प्रक्रियेबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. या सर्व रुग्णालयांची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी, पंचायत समिती इंदापूर यांना दिले आहेत. संबंधित चौकशीचा अहवाल सात दिवसांत सादर करण्याचे निर्देश पत्रातून देण्यात आले आहेत.
 १३ ऑगस्ट २०२६ रोजी केलेल्या तक्रारदाराने  तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य विभागाने ही कार्यवाही केली आहे. तक्रारीनुसार, इंदापूर तालुक्यातील काही रुग्णालये आवश्यक नोंदणी/नूतनीकरणाशिवाय सुरू असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित रुग्णालयांची नोंदणीची स्थिती, कागदपत्रे आणि अन्य आवश्यक बाबींची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  १६ रुग्णालयांची होणार चौकशी.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या पत्रात नमूद करण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये डॉ. सुरज जालिंदर काळे यांचे काळे क्लिनिक अँड अपघात हॉस्पिटल, पळसदेव; डॉ. श्रुती भारत नेलेकर यांचे श्री निळकंठेश्वर आयसीयू व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल; डॉ. अनुराधा वसंत कांडळकर यांचे केअर अँड क्युअर मॅटरनिटी क्लिनिक, कळंब; डॉ. सचिन पांडुरंग वायसे यांचे वायसे हॉस्पिटल लासुर्णे,; डॉ. महेश गोपीचंद घोळवे यांचे घोळवे हॉस्पिटल, भवानीनगर; डॉ. वसंत भगवान दगडे यांचे सुयश मॅटर्निटी व सर्जिकल नर्सिंग होम, वालचंदनगर; तसेच डॉ. माधवराव जयसिंहराव नाईकनिंबाळकर यांचे नाईकनिंबाळकर हॉस्पिटल, भिगवण यांचा समावेश आहे.
याशिवाय डॉ.अक्षय चंद्रकांत कविश्वर यांचे आशा नर्सिंग होम; डॉ. नितीन सोपान लोंढे यांचे संजीवनी अॅक्सिडेंट हॉस्पिटल, वालचंदनगर; डॉ. भागवत दादा जाधव यांचे साई क्रिटिकेअर हॉस्पिटल, बावडा; डॉ. राजेंद्र रामचंद्र शिंदे यांचे डॉ. शिंदे लहान मुलांचे हॉस्पिटल, वालचंदनगर; डॉ. विकास भरतलाल शहा यांचे शहा मॅटर्निटी अँड सर्जिकल नर्सिंग होम, कळंब-वालचंदनगर; डॉ. जयश्री महावीर गांधी यांचे चैतन्य हॉस्पिटल व मॅटर्निटी होम, भिगवण; डॉ. ज्ञानेश्वर परशुराम रेणुकर यांचे यशोधरा आयसीयू अँड ट्रॉमा सेंटर, भिगवण; डॉ. चंद्रशेखर गोविंद कोकाटे यांचे वरद विनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, लासुर्णे आणि डॉ. इंद्रजित प्रविण दोशी यांचे बावडा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, बावडा या रुग्णालयांचीही चौकशी होणार आहे.
 आशा नर्सिंग होमच्या शैक्षणिक पात्रतेवरही आक्षेप.
याच तक्रारदाराच्या स्वतंत्र तक्रारीच्या आधारे डॉ. अक्षय चंद्रकांत कविश्वर यांच्या आशा नर्सिंग होम, मौजे कळंब, रोड, ता. इंदापूर यांच्याबाबतही जिल्हा आरोग्य विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत. तक्रारीमध्ये डॉ. कविश्वर यांच्या शैक्षणिक पात्रतेसह इतर बाबींवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
तक्रारीत डॉ. अक्षय चंद्रकांत कविश्वर यांच्या शाळेतील नाव, डीग्री व रजिस्ट्रेशन तसेच इतर शासकीय दस्तऐवजांमधील नोंदींमध्ये तफावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.तसेच राजस्थान विद्यापीठ, जयपूर येथील प्रमाणपत्रावर ‘मा. कुलगुरू’ यांच्या नावाबाबत तसेच विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नावांच्या यादीमध्ये संबंधित नाव नसल्याबाबतही तक्रारीत आक्षेप घेण्यात आला आहे.
 नोंदणीपूर्वी पात्रतेची पडताळणी झाली का?
आशा नर्सिंग होमची नोंदणी करताना संबंधित डॉक्टरांच्या शैक्षणिक अहर्तेची योग्य पद्धतीने पडताळणी करण्यात आली होती का, याचीही चौकशी करण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले आहेत. तपासणीदरम्यान कोणतीही अनियमितता आढळल्यास प्रचलित कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली होती.
 आरोग्य विभागाच्या चौकशीकडे लक्ष.
या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना संबंधित सर्व बाबींची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता या १६ रुग्णालयांच्या नोंदणी-नूतनीकरणाची वैधता, उपलब्ध शासकीय कागदपत्रे, संबंधित वैद्यकीय पात्रता आणि नोंदणी प्रक्रियेदरम्यान झालेली पडताळणी याबाबत नेमके काय निष्पन्न होते, याकडे इंदापूर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
———————————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *