तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या कौतुकानी सन्मानित,
ब्रिटिश कालीन खानोठा पुलासाठी योगदान दिल्याने काही काळ खानावटे या नावाने परिचित
भिगवण: डिकसळ( ता.इंदापुर)
येथील किसनराव कल्याण गायकवाड ( वय ८८) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी निधन झाले.किसनराव गायकवाड हे सार्वजनिक बांधकाम विभागातुन २००१ साली सेवानिवृत्त झाले होते. आपल्या सेवेच्या तीस वर्षाच्या काळात पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मार्ग संरक्षक म्हणून इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव ते दौंड तालुक्यातील पाटस या ९० किलोमीटरच्या अंतरावर कार्यरत होते. १९९२ साली तात्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पंढरपूर येथे जात असताना डाळज गावच्या हद्दीत आपल्या गाड्यांचा ताफा थांबवून भर उन्हात आपले कर्तव्य पार पाडत असलेल्या किसनराव गायकवाड यांचे कौतुक केले होते.१९७९ साली उजनी धरण झाल्यानंतर हत्तीच्या मस्तकाच्या काळ्याभोर जमिनी पाण्याखाली गेल्यानंतर भूमिहीन झालेल्या आपल्या कुटुंबाला सावरण्यासाठी किसनराव गायकवाड यांनी आपल्या चार भावंडांना आपले मामा गुलाबराव सकुंडे यांच्या मदतीने शासकीय सेवेत रुजू करून घेतले होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पाठीमागे पत्नी ,चार भावंडे मुलगा,पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. भिगवण पत्रकार संघाचे अध्यक्ष विजयकुमार गायकवाड हे त्यांचे पुतणे होत. ब्रिटिश कालीन खानोठा रेल्वे पुलासाठी योगदान दिल्यामुळे ते काही काळ खानावटे या नावाने परिचित होते. बडोद्याच्या राजकीय गायकवाड घराण्याचा त्यांना वारसा आहे.