भिगवण पंचायत समिती गणातून शैलजा गायकवाड उमेदवारीसाठी चर्चेत
उमेदवारीपेक्षा पक्षनिष्ठा महत्वाची : शैलजा गायकवाड
भिगवन /प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी भिगवण पंचायत समिती गणातून ज्यांना संधी देईल त्या उमेदवाराच्या विजयासाठी मनोभावे प्रचार करणार असल्याचे डिकसळ येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या व योगेश्वरी महिला पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा शैलजा विजयकुमार गायकवाड यांनी व्यक्त केले. शैलजा गायकवाड ह्या भिगवण पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीत त्यांनी मुलाखत दिली असून पक्षाने त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी उमेदवारीपेक्षा पक्षनिष्ठा महत्वाची असून पक्षाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य असल्याचे सांगितले. तसेच पक्षाने संधी दिल्यास संधीचे सोने करणार असल्याचे सांगितले. पक्षाने घराणेशाही व आर्थिक बाबीचा विचार न करता पक्षाशी प्रामाणिक असणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. भिगवण पंचायत समिती गणातुन भारतीय जनता पार्टीतुन गायकवाड यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.


