अपघात करून पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा सहा दिवसांत छडा!
भिगवण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; वाहनासह चालक ताब्यात;
भिगवण प्रतिनिधी :
रात्रीच्या वेळी दुचाकीला धडक देऊन अपघाताची कोणतीही माहिती न देता पसार झालेल्या अज्ञात चारचाकी वाहनाचा आणि चालकाचा भिगवण पोलिसांनी अवघ्या सहा दिवसांत शोध घेत गुन्हा उघडकीस आणला. या कारवाईमुळे अपघात करून पसार होणाऱ्या वाहनचालकांचा शोध घेणे शक्य असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
दिनांक १३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडेसातच्या सुमारास शेटफळगढे, ता. इंदापूर येथील बारामती-भिगवण रस्त्यावर कोठारी फार्मजवळ हा अपघात झाला. साहिल प्रवीण भोसले (वय २५, रा. उद्धट, ता. इंदापूर) हे त्यांच्या बुलेट मोटारसायकल क्रमांक एमएच ४२ बीटी ०००७ वरून बारामतीहून भिगवणच्या दिशेने जात असताना अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात साहिल भोसले यांना गंभीर दुखापत झाली व त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला.
या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः वर्षभरापूर्वी अपघातात आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या तरुणाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत होती. अपघात करून वाहनचालक पसार झाल्यानंतर वाहनाचा शोध लागणे कठीण असते, अशी नागरिकांमध्ये निर्माण झालेली भावना दूर करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.
भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्यासाठी विशेष तपास पथक नियुक्त केले. तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. मात्र अपघाताची वेळ रात्रीची असल्याने अनेक ठिकाणचे फुटेज स्पष्ट दिसत नव्हते, तसेच ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात सीसीटीव्ही उपलब्ध नसल्याने तपासासमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.
तरीही पोलिसांनी तांत्रिक तपासासोबतच गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून माहिती संकलित करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अखेर अपघातास कारणीभूत ठरलेले पांढऱ्या रंगाचे मारुती सुझुकी कंपनीचे वाहन क्रमांक एमएच ४२ एएस ८१२३ असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी वाहनाचा शोध घेत चालक विरेंद्र मनोहर सोनवणे (वय ४७, रा. मोतीबाग, गुणवडी, ता. बारामती) याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत सदर चालकाने अपघाताबाबत माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. अशाप्रकारे भिगवण पोलिसांनी अवघ्या सहा दिवसांत अपघात करून पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा व चालकाचा शोध घेत गुन्हा उघडकीस आणला.
ही उल्लेखनीय कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या तपास पथकात पोलीस अंमलदार नानासाहेब सूर्यवंशी, रामदास कर्चे, सचिन पवार, योगेश कुलकर्णी, तुषार रायकर व दत्तात्रय गवळी यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार नानासाहेब सूर्यवंशी करीत आहेत.

