आदर्श विद्यालयाच्या ‘शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!
‘जिल्हास्तरीय शालेय वुशू स्पर्धेत आदित्य कुंभारचे सुवर्णयश; विभागीय स्पर्धेसाठी निवड;
भिगवण/प्रतिनिधी
युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७ वर्षांखालील वयोगटातील ६५ किलोखालील वजनगटाच्या पुणे ग्रामीण जिल्हास्तरीय शालेय वुशू स्पर्धा बी. एच. चाटे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, गाऊडदरा, ता. हवेली, जि. पुणे येथे उत्साहात पार पडल्या.
या स्पर्धेत आदर्श माध्यमिक विद्यालय, भिगवण येथील विद्यार्थी आदित्य आशिष कुंभार याने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या दमदार कामगिरीच्या जोरावर आदित्यची दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी ल. ना. हाऊसिंग उच्च माध्यमिक विद्यालय, जामखेड येथे होणाऱ्या विभागीय वुशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
आदित्यच्या या यशामुळे आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याला वुशू प्रशिक्षक गणेश घुले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
आदित्यच्या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. चंद्रकांत खानावरे, अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे तसेच संस्थेचे सर्व संचालक यांनी त्याचे अभिनंदन केले असून, आगामी विभागीय वुशू स्पर्धेसाठी त्याला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
ही माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुचिता अशोक साळुंके यांनी दिली.

