इंदापूरपुणे

तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेते एकवटले!

Spread the love

२५ नोव्हेंबरला इंदापूर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा; सोनाई पॅलेस येथे सर्वपक्षीय पत्रकार परिषद संपन्न!

भिगवण : प्रतिनिधी

इंदापूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात तालुक्यातील सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी आणि सामाजिक संघटना एकवटल्या आहेत. तहसीलदारांच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यासाठी सोनाई पॅलेस येथे सर्वपक्षीय पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत तहसीलदारांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप नोंदवले. तसेच २५ नोव्हेंबर रोजी इंदापूर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेला माजी बांधकाम सभापती प्रवीण माने, भाजपचे नेते प्रदीप गारटकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नितीन शिंदे, शिंदे गटाचे प्रतिनिधी, शरद पवार गटाचे महारुद्र पाटील, शरद चितारे, तानाजी धोत्रे, निलेश देवकर, काँग्रेसचे पदाधिकारी तसेच लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. विविध राजकीय विचारधारांचे प्रतिनिधित्व करणारे नेते एकाच व्यासपीठावर आल्याने या पत्रकार परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

२५ नोव्हेंबरला तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

तहसीलदारांच्या कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप उपस्थित नेत्यांनी केला. प्रशासनाच्या कथित मनमानी कारभाराविरोधात आणि गोरगरीब जनतेवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता इंदापूर नगरपालिकेजवळ सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले. तेथून तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे.

प्रवीण माने यांची प्रशासनाच्या कारभारावर नाराजी

यावेळी सोनाई परिवाराचे सर्वेसर्वा तथा माजी बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी तहसीलदारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, तहसीलदारांच्या कामकाजाबाबत सामान्य जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. आमचा तहसीलदारांशी वैयक्तिक कोणताही वाद अथवा मतभेद नाही. मात्र, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देणे ही आमची जबाबदारी आहे. एका अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीविरोधात सर्व राजकीय पक्षांना एकत्र येऊन आंदोलन करण्याची वेळ येणे ही दुर्दैवी बाब आहे. तहसीलदारांच्या कारभारामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका त्यांनी केली.

तसेच तहसील कार्यालयातील कनिष्ठ कर्मचारी वर्ग चांगल्या पद्धतीने काम करत असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मोर्चामध्ये सर्वांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रदीप गारटकर यांचा तहसीलदारांच्या कार्यपद्धतीवर घणाघात

भाजपचे नेते प्रदीप गारटकर यांनी तहसीलदारांच्या कामकाजावर तीव्र शब्दांत टीका केली. देशाची व्यवस्था कायद्याने चालते आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी प्रशासनावर असते. तालुक्याचा प्रमुख अधिकारी म्हणून तहसीलदारांनी जनतेशी संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. मात्र, नागरिकांशी उर्मटपणे बोलणे, वयोवृद्ध नागरिकांना योग्य वागणूक न देणे आणि आर्थिक व्यवहारांशिवाय कामे होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

गरिबांनी आपल्या कामांसाठी कोणाकडे जायचे? सामान्य नागरिकांना न्याय मिळणार नसेल तर प्रशासनाचा उपयोग काय? असा सवाल उपस्थित करत त्यांनी तहसीलदारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जनतेशी सन्मानाने वागावे, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

हा लढा व्यक्तीविरोधात नव्हे, तर प्रशासनातील चुकीच्या व्यवस्थेविरोधात

या आंदोलनामागे कोणताही वैयक्तिक स्वार्थ किंवा वैयक्तिक वाद नसून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा, हा मुख्य उद्देश असल्याचे उपस्थित नेत्यांनी स्पष्ट केले. प्रशासनातील चुकीच्या पद्धती, नागरिकांना होणारा कथित त्रास आणि प्रलंबित प्रश्न याविरोधात सर्वपक्षीय पातळीवर आवाज उठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तहसीलदारांच्या कार्यपद्धतीत सुधारणा व्हावी तसेच त्यांच्यावर योग्य प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

सर्वपक्षीय एकजुटीमुळे आंदोलनाला महत्त्व

इंदापूर तालुक्याच्या राजकीय इतिहासात प्रशासनातील एका अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीविरोधात सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर येऊन आंदोलनाची भूमिका घेत असल्याने या घडामोडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. पत्रकार परिषदेत उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांनी २५ नोव्हेंबरच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा देत आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचे स्पष्ट केले.

आता २५ नोव्हेंबर रोजी निघणाऱ्या या मोर्चात किती मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतात आणि प्रशासन या सर्वपक्षीय मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे इंदापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *