रेल्वे कर्मचाऱ्यांसहित ,लोको पायलट ,गार्ड, यांच्या किलोमेट्रिक भत्यात वाढ!
मुंबई/ प्रतिनिधी:- दत्तात्रेय अवघडे
रेल्वेने रेल्वेतील रनिंग स्टाफसाठी किलोमीट्रेज अलाउन्स मध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे . हा निर्णय महागाई भत्ता 50 टक्के झाल्यानंतर घेण्यात आला आहे . हा भत्ता जानेवारी 2024 पासून लागू केला जाणार आहे . या निर्णयामुळे रेल्वेतील लोको पायलट आणि गार्ड यांसारख्या कर्मचाऱ्यांना दोन वर्षांचा एरियर्स थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे .
किलोमीट्रेज भत्त्याचा लाभ त्याच कर्मचाऱ्यांना मिळणार आहे जे कर्मचारी रनिंग डयुटीशी संबंधित आहेत . यामध्ये मेल , पॅसेंजर आणि मालवाहतूक ट्रेनचे लोको पायलट , सहायक लोको पायलट , शटिंग स्टाफ , ब्रेक्समॅनसोबत गार्ड ( ट्रेन मॅनेजर ) यांचा समावेश आहे . या कर्मचाऱ्यांना हा भक्ता एप्रिल महिन्यात मिळण्याची शक्यता इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनने वर्तवली आहे . मेल आणि एक्सप्रेस ट्रेनच्या लोको पायलटला प्रति 100 किलोमीटरसाठी 606 रुपये मिळतील . पॅसेंजर ट्रेनच्या लोको पायलटसाठी हे दर 600 रुपये , तर मालवाहतूक ट्रेनच्या पायलटसाठी 594 रुपये ठरवण्यात आले आहे . सहायक लोको पायलटला आता 430 रुपये प्रति 100 किलोमीटर मिळतील . तर शटिंग ग्रेड -1 साठी हा दर 461 रुपये ठरवण्यात आला आहे . किलोमीट्रेज अलाउन्स रनिंग स्टाफच्या पगारातला एक मोठा भाग आहे . यात वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल . यामुळे आता कर्मचारी जेवढे दूरपर्यंत रेल्वे चालवतील तेवढी त्यांच्या मासिक उत्पन्नात वाढ होईल .
ट्रफिक रनिंग स्टाफ म्हणजेच गार्डसाठी सुद्धा नवीन दर लागू केले आहेत . यात मेल किंवा एक्सप्रेस गार्डला 549 रुपये प्रति 100 किमीसाठी मिळतील . वरिष्ठ पॅसेंजर आणि गुड्स गार्डसाठी 543 रुपये मिळतील . साधारण गुड्स गार्डसाठी 537 रुपये प्रति 100 किमीसाठी मिळतील . असिस्टेंट गार्डसाठी प्रति 100 किमीसाठी 305 रुपये दिले जातील . या भत्त्यानंतर पगारात वाढ होईल . रेल्वे रनिंग स्टाफला हा विशेष भत्ता दिला जातो . कारण , कठीण परिस्थितीत आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांत त्यांना डयुटी करावी लागते . त्यांना सामान्य डेली अलाउन्स टीए – डीएची सुविधा मिळत नाही . या पगार वाढीनंतर कर्मचाऱ्यां मध्ये आनंदाचं वातावरण पाहावयास मिळाले आहे व कामकाज करण्यातही उत्साह निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले,

