पुणेबारामती

बारामतीत मोटारसायकल चोरट्यांचा पर्दाफाश!

Spread the love

 

दोन स्वतंत्र कारवायांत चार आरोपी जेरबंद; १० मोटारसायकलींसह ४ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

बारामती | प्रतिनिधी

बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मोटारसायकल चोरीच्या घटनांचा छडा लावत मोठी कारवाई केली आहे. बारामती एमआयडीसी व परिसरातून मोटारसायकलींची चोरी करणाऱ्या दोन स्वतंत्र टोळ्यांचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत एकूण चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल १० मोटारसायकली असा एकूण ४ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे दुचाकी चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.

तक्रारीनंतर पोलिसांचा तपास सुरू

बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे २७ ऑक्टोबर २०२६ रोजी पियुष मनोजकुमार तुशबंड (वय २१, रा. खंडोबानगर, बारामती) यांनी मोटारसायकल चोरीची तक्रार दिली होती. त्यांच्या मालकीची होंडा कंपनीची काळ्या रंगाची युनिकॉर्न मोटारसायकल तसेच मोटारसायकलच्या सीटमध्ये ठेवलेले दोन विवो कंपनीचे मोबाईल हँडसेट २६ ऑक्टोबरच्या रात्री ते २७ ऑक्टोबरच्या सकाळच्या दरम्यान डायनामिक्स डेअरीसमोरून चोरीला गेले होते.

या घटनेची गंभीर दखल घेत बारामती तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली.

अकलूजमध्ये सापळा रचून दोघांना अटक

तपासादरम्यान इमरान फिरोज शेख (वय २१, रा. यशवंतनगर, अकलूज) आणि श्री उर्फ श्रीराज नवनाथ वाघंबरे (वय २१, रा. विझोरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांच्यासह एका विधिसंघर्षित बालकाचा या चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अकलूज येथे दोन स्वतंत्र पथके तयार करून सापळा रचला. या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चोरीस गेलेली मोटारसायकल व दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले.

अधिक चौकशीदरम्यान संबंधित आरोपींनी बारामती परिसरातून आणखी तीन मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी अकलूज येथून या मोटारसायकलीही जप्त केल्या. अशा प्रकारे पहिल्या कारवाईत चार मोटारसायकली आणि दोन मोबाईल असा एकूण १ लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सहा गुन्ह्यांची उकल; आणखी सहा दुचाकी हस्तगत

याच तपासादरम्यान बारामती तालुका पोलीस स्टेशनमधील मोटारसायकल चोरीच्या आणखी सहा गुन्ह्यांचा तपास पुढे आला. या प्रकरणांत गणेश शिवा काळे (वय २९, रा. मोरेवस्ती, वरकुटे खुर्द, ता. इंदापूर) आणि प्रज्वल प्रतापराव मुंडफुणे पाटील (वय २४, रा. महाळुंग, ता. माळशिरस, जि. सोलापूर; सध्या रा. पिटकेश्वर रोड, निमगाव केतकी, ता. इंदापूर) यांचा सहभाग निष्पन्न झाला.

या दोघांकडून चोरीच्या सहा मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, त्यांची किंमत सुमारे २ लाख ५० हजार रुपये आहे. या कारवाईमुळे बारामती तालुका पोलीस स्टेशनमधील मोटारसायकल चोरीचे आणखी सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

चार लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

बारामती तालुका पोलिसांनी केलेल्या या दोन्ही कारवायांमध्ये एकूण १० मोटारसायकली आणि दोन मोबाईल फोन असा ४ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. संबंधित गुन्ह्यांचा पुढील तपास सुरू आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी

ही उल्लेखनीय कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

बारामती तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नारायण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग शिंदे तसेच गुन्हे शोध पथकातील सहायक फौजदार सुरेंद्र वाघ, पोलीस हवालदार भारत खारतोडे, सुधीर काळे, योगेश टिळेकर, किशोर वीर, सागर देशमाने, पोलीस कर्मचारी मनोज पवार, जितेंद्र शिंदे, अवधूत शिंदे, शाहरुख शेख, आर्यन कदम यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सुधीर काळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *