जबर चोरीच्या गुन्ह्यातून पोलिसाची निर्दोष मुक्तता; मे. काळे न्यायालयाचा निकाल!
राजेगाव / प्रतिनिधी:
बारामती तालुक्यातील एका खळबळजनक जबर चोरीच्या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मे. काळे यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणातील आरोपी विनोद नामदास याची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
सदर गुन्हा वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(६), ३(५) आणि ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे, आरोपी हा जेजुरी पोलीस स्टेशन येथे पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत होता. एका वृद्ध महिलेला रस्त्यात अडवून, त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून लूटमार केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
बचाव पक्षाचा युक्तिवाद
या खटल्यामध्ये बचाव पक्षातर्फे प्रसिद्ध वकील ॲड. भार्गव पाटसकर यांनी काम पाहिले. त्यांनी न्यायालयात अतिशय प्रभावीपणे बाजू मांडली. ॲड. पाटसकर यांनी आपल्या युक्तिवादात पोलीस तपासातील त्रुटी, साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती आणि ठोस पुराव्यांचा अभाव या मुद्द्यांवर न्यायालयाचे लक्ष वेधले. सरकारी पक्षाला आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध करता आला नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला.
न्यायालयाचा निर्णय
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आणि सादर केलेल्या पुराव्यांचे अवलोकन केल्यानंतर, न्यायालयाने ॲड. पाटसकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरला. संशयाचा फायदा देत न्यायालयाने विनोद आणि रामदास याची या गंभीर गुन्ह्यातून सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालामुळे आरोपीच्या कुटुंबाने सुटकेचा निःश्वास टाकला असून, बचाव पक्षाच्या कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

