वाहतूक नियम मोडणाऱ्यांना भिगवण पोलिसांचा दणका!
मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या २२ वाहनचालकांवर कारवाई; विविध नियमभंगांतून ६० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल
भिगवण | संपादक तुकाराम पवार
भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहतुकीला शिस्त लागावी, रस्ते अपघातांना आळा बसावा आणि नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहावी, या उद्देशाने भिगवण पोलिसांनी ऑक्टोबर २०२६ या महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम राबवून धडक कारवाई केली आहे. या मोहिमेत मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या २२ वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, विविध वाहतूक नियमभंगांप्रकरणी एकूण ६० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शहरासह ग्रामीण भागात वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतुकीचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक झाले आहे. अनेक वाहनचालकांकडून नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अपघातांचा धोका निर्माण होतो. याची गांभीर्याने दखल घेत भिगवण पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम हाती घेतली.
या मोहिमेदरम्यान दुचाकींना नियमबाह्य मॉडिफाईड सायलेन्सर बसवून मोठ्या आवाजात वाहने चालविणाऱ्या २२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या सायलेन्सरवर नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली. याशिवाय ट्रिपल सीट प्रवास, नंबर प्लेट नसलेली वाहने, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, वाहतुकीचे नियम मोडणे तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलींच्या नियमबाह्य वाहतुकीवरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले.
विशेषतः शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी वाहनांमध्ये मोठ्या आवाजात टेप वाजवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांविरुद्धही कारवाई करण्यात आली. अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने पोलिसांनी या बाबींनाही प्राधान्य दिले.
वाहनचालकांना पोलिसांचे आवाहन
वाहन चालविताना प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळावेत, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, वाहनांना नियमबाह्य मॉडिफाईड सायलेन्सर लावू नयेत, ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलींना आवश्यक रिफ्लेक्टर बसवावेत, तसेच वाहनांमध्ये मोठ्या आवाजात गाणी वाजवून ध्वनिप्रदूषण करू नये, असे आवाहन भिगवण पोलिसांकडून करण्यात आले आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही नियमित तपासणी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही मोहीम पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
भिगवण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार गणेश कर्चे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक वारगड, पोलीस अंमलदार शंकर भोसले, समीर झांबरे, रणजित मुळीक तसेच महिला पोलीस अंमलदार भोंग यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
नियम पाळा, सुरक्षित प्रवास करा!
वाहतुकीचे नियम हे केवळ दंड टाळण्यासाठी नसून स्वतःच्या आणि इतरांच्या जीविताच्या सुरक्षिततेसाठी आहेत. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकाने जबाबदारीने वाहन चालवून अपघातमुक्त आणि शिस्तबद्ध वाहतुकीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन भिगवण पोलिसांनी केले आहे.

