उल्हासनगर मध्ये FDA ची म्हशीच्या गोठ्यावर धाड , जास्त दुधासाठी दिली जाणारी शेकडो ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स जप्त!
उल्हासनगर /- प्रतिनिधी : – दत्तात्रेय अवघडे
राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे ( FDA ) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नातील भेसळ आणि बेकायदेशीर औषधांचा वापर करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम सुरू आहे . याच पार्श्वभूमीवर उल्हासनगरमध्ये एक मोठी कारवाई समोर आली आहे . , उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 मधील ओटी सेक्शन , जसलोक हायस्कूल परिसरात असलेल्या प्रकाश वाधवानी याच्या म्हशीच्या गोठ्यावर एफडीएच्या पथकाने हा छापा टाकला . या छाप्यात जास्त दुधासाठी जनावरांना टोचली जाणारी 612 प्रतिबंधित इंजेक्शन्स आणि त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे .
ऑक्सिटोसिन या औषधाचा वापर जनावरांच्या आरोग्यासाठा घातक आणि क्रूर मानला जातो . या इंजेक्शन्समुळे जनावरांना प्रचंड त्रास होतो . इतकेच नाही तर , अशा प्रकारे ऑक्सिटोसिन देऊन काढलेल्या दुधाचे सेवन केल्यास मानवी आरोग्यावर , विशेषतः लहान मुलांवर आणि गरोदर महिलांवर गंभीर दुष्परिणाम होण्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते . याच कारणामुळे या औषधाच्या विक्रीवर आणि वापरावर शासनाने कायद्याने पूर्णपणे बंदी घातलेली आहे .
राज्यात सध्या सुरू असलेल्या विशेष मोहिमेचा भाग म्हणून उल्हासनगरातील ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे . बेकायदेशीरपणे औषधांचा साठा बाळगल्याप्रकरणी आणि जनावरांच्या आरोग्याशी खेळ केल्याप्रकरणी संबंधित गोठा चालकावर अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाच्या कायद्यानुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे . एफडीएच्या या धडक कारवाईमुळे उल्हासनगर आणि ठाणे जिल्ह्यातील बेकायदेशीर दुग्ध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत,

