ताज्या बातम्याबारामती

बारामतीत गोळीबार करणारे आरोपी आठ तासांत जेरबंद;

Spread the love

 

बारामती तालुका पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दोन पिस्तुले जप्त!

बारामती : प्रतिनिधी

बारामती शहरातील सूर्यनगरी परिसरात दोन लाख रुपयांच्या खंडणीच्या मागणीवरून चारचाकी वाहनावर गोळीबार केल्याच्या घटनेतील आरोपींना बारामती तालुका पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्या पथकाने अवघ्या आठ तासांत जेरबंद केले. या कारवाईत दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेली दोन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत.दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी राजन धनंजय कोळेकर (वय ३५, रा. अनन्या व्हिला, शिवशंभो नगर, नक्षत्र गार्डनच्या पाठीमागे, बारामती) यांच्याकडे बंड्या उर्फ अक्षय काळे व त्याच्या दोन साथीदारांनी दोन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. मात्र, फिर्यादी यांनी खंडणी देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्यांच्या बंगल्याच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला.या घटनेप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पाच तपास पथके रवाना करण्यात आली होती.तपासादरम्यान पोलिसांनी दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली दोन पिस्तुले जप्त करण्यात आली. हा गुन्हा बंड्या उर्फ अक्षय काळे याच्यासोबत मिळून केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अक्षय काळे याचा शोध घेऊन त्याला अटक केली.

तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली. सन २०१५ ते २०१९ या कालावधीत फिर्यादी राजन धनंजय कोळेकर यांच्या कन्स्ट्रक्शनची ज्या-ज्या ठिकाणी कामे सुरू होती, त्या ठिकाणी बंड्या उर्फ अक्षय काळे हा बॉबकॅट मशीन चालवत होता. त्यामुळे फिर्यादी राजन कोळेकर आणि बंड्या उर्फ अक्षय काळे हे एकमेकांच्या परिचयाचे होते.

या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पवार करीत आहेत.ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या कारवाईत बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पवार, तपास पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणच्या पथकाने सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *