बारामतीत खंडणीसाठी धमकी दिल्यानंतर चारचाकीवर गोळीबार; परिसरात खळबळ!
बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरातील सूर्यनगरी परिसरात खंडणीच्या मागणीवरून एका व्यावसायिकाच्या घराबाहेर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनावर गोळीबार झाल्याची घटना दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी घडली. या घटनेमुळे बारामती शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यनगरी येथील महादेव मंदिराजवळ राहणारे राजन धनंजय कोळेकर यांना सायंकाळी ४.१८ वाजण्याच्या सुमारास ‘बी.के. ग्रुप’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण बी.के. बोलत असल्याचे सांगत, “तुम्ही सर्वांना पैसे देता, मला दोन पेटी (दोन लाख रुपये) द्या,” अशी मागणी केली. यावर कोळेकर यांनी कोणालाही पैसे दिले नसून आपणही पैसे देणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने फोन कट केला.दरम्यान, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोळेकर यांच्या घराबाहेर मोटारसायकल जोरात रेस केल्याचा आवाज आला. नेमके कोण रेस करीत आहे, हे पाहण्यासाठी त्यांनी घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींपैकी एकाने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या त्यांच्या चारचाकी वाहनावर गोळीबार केल्याचे निदर्शनास आले.घटनेनंतर कोळेकर यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता वाहनाच्या मागील बाजूच्या पत्र्यावर गोळी लागल्याचे निशाण आढळले. तसेच घटनास्थळी गोळीचा पुढील भाग आणि एक रिकामे काडतूसही आढळून आले. गोळीबार झाला त्यावेळी वाहनात किंवा पार्किंग परिसरात कोळेकर यांच्या कुटुंबातील कोणीही उपस्थित नव्हते.या घटनेतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या दोन पथकांसह स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक रवाना करण्यात आले आहे. राजन कोळेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी न्यायवैज्ञानिक पथकालाही (FSL) पाचारण करण्यात आले आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक नारायण पवार तसेच बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली. खंडणीची मागणी आणि त्यानंतर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

