उजनी धरणातील प्रस्तावित प्रकल्पाविरोधात रांजणी चौकात जनआक्रोश!

शेतकरी, वारकरी, मच्छीमारांसह ग्रामस्थांचा तीव्र विरोध; आमदार रोहित पवार आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा प्रकल्पावर जोरदार आक्षेप
भिगवण | संपादक तुकाराम पवार
उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या डेटा सेंटर, सौर ऊर्जा, अणुऊर्जा आणि ग्रीन हायड्रोजन प्रकल्पांविरोधात रांजणी चौक येथे शेतकरी, मच्छीमार, वारकरी संप्रदाय आणि स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने एकत्र येत तीव्र विरोध दर्शविला. सोलापूर, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील शेतकरी व नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. सकाळी नऊ वाजल्यापासून नागरिकांची गर्दी जमण्यास सुरुवात झाली होती. महिला वर्गाचाही या आंदोलनात लक्षणीय सहभाग दिसून आला.
उजनी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती, मच्छीमारी व्यवसाय, धार्मिक परंपरा आणि स्थानिक नागरिकांचे जनजीवन या प्रस्तावित प्रकल्पामुळे प्रभावित होण्याची भीती आंदोलकांनी व्यक्त केली. सुमारे १ लाख ६५ हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावित प्रकल्पाबाबत अनेक मान्यवरांनी आपली भूमिका मांडत शासनाने स्थानिक नागरिकांच्या भावना आणि पर्यावरणीय परिणामांचा विचार करावा, अशी मागणी केली.
यावेळी आमदार रोहित पवार यांनी प्रकल्पाच्या संभाव्य फायद्यांसोबतच त्यातून निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय आणि सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधले. त्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकल्पामुळे परिसरातील तापमानात सुमारे चार अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता असून, ध्वनिप्रदूषणाचा स्तर ९५ डेसिबलपर्यंत जाऊ शकतो. तसेच प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता भासणार असून, सुमारे नऊ टीएमसी पाणी लागण्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वीज वापरली जाणार असल्याचा दावा करताना, सोलापूर जिल्ह्याच्या वीजपुरवठ्यावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. उजनीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी कमी पाणी मिळण्याची भीती, मच्छीमारांच्या पारंपरिक व्यवसायावर होणारे संभाव्य परिणाम आणि वारकरी संप्रदायासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्न त्यांनी मांडला.
अणुऊर्जा प्रकल्पाच्या संभाव्य किरणोत्सर्गाबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. अशा प्रकल्पांचे पर्यावरणीय परिणाम, सुरक्षितता आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गांभीर्याने तपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात स्थानिकांना किती रोजगार मिळणार, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनीही प्रकल्पाच्या सुरक्षिततेचा आणि पर्यावरणीय परिणामांचा मुद्दा उपस्थित केला. अमेरिका यांसारख्या प्रगत देशांमध्ये अशा प्रकल्पांना विरोध झाल्यामुळे ते भारतात आणले जात असल्याचा दावा त्यांनी आपल्या भाषणात केला. महाराष्ट्रात अशा प्रकल्पांच्या उभारणीपूर्वी स्थानिक जनतेला विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी रोहित पवार यांनी अशा संभाव्य धोकादायक प्रकल्पांना सर्वांनी एकत्रितपणे विरोध करण्याची गरज असल्याचे सांगितले. कृषिमंत्री भरने मामांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला पाहिजे असे मत ही व्यक्त केले तसेच सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना उद्देशून त्यांनी मिश्किल टिप्पणी करत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या भूमिकेची दखल घ्यावी, असा संदेश दिला. कारण पालकमंत्री प्रकल्प उभारण्यासाठी लोकांना दमदाटी करत असल्याचे बोलले जात असल्या असल्या कारणास्तव त्यांनी पालकमत्र्यांना टोला दिला,
आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांनी भ्रमणध्वनीद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन प्रस्तावित प्रकल्प स्थगित करण्याची मागणी करणार असून, या लढ्यात आपण आंदोलकांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार रोहित पवार यांनी आपल्या भाषणात विकासाला आपला विरोध नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, विकासाच्या नावाखाली शेतकरी, मच्छीमार, वारकरी आणि सामान्य नागरिकांच्या जीवनावर परिणाम होणार असेल, तर अशा प्रकल्पाला विरोध करणे आवश्यक आहे. स्थानिक जनतेच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आपण सदैव त्यांच्या सोबत राहू, अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली.
या आंदोलनाला आमदार रोहित पवार, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, संजय शिंदे, महादेव जानकर, प्रतापसिंह पाटील, दीपक पाटील, आमदार नारायण आबा पाटील, बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
उजनीचे पाणी, शेती आणि स्थानिकांचे भवितव्य केंद्रस्थानी
उजनी धरण हे परिसरातील शेती, पिण्याचे पाणी, मच्छीमारी व्यवसाय आणि धार्मिक परंपरांसाठी महत्त्वाचे जलस्रोत आहे. त्यामुळे प्रस्तावित प्रकल्पाबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पाण्याची उपलब्धता, पर्यावरणीय परिणाम, स्थानिक रोजगार, सुरक्षितता आणि नागरिकांचे हित यांचा सखोल विचार करण्यात यावा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
एकूणच, रांजणी चौकातील या आंदोलनातून उजनी धरण परिसरातील प्रस्तावित प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिकांमध्ये असलेली चिंता आणि विरोधाची भावना स्पष्टपणे समोर आली. शासनाने जनभावनेची दखल घेऊन संबंधित घटकांशी चर्चा करावी आणि स्थानिकांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

