पुरंदर

सासवडमध्ये गावठी पिस्तूल बाळगणारा सराईत आरोपी अटकेत 

Spread the love

मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

सासवड/ प्रतिनिधी : सासवड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत आरोपीला अटक केली आहे. रोहित राजू माने (वय २४, रा. गुजरवाडी, दत्तनगर, निंबाळकरवस्ती, कात्रज, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल, मॅगझीन आणि मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सासवड परिसरात करण्यात आली.

पोलीस निरीक्षक संतोष घोळवे व गुन्हे प्रकटीकरण पथक सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सासवड येथील सैनिक कॅन्टीनच्या पाठीमागे एका व्यक्तीकडे गावठी पिस्तूल आहे. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत व पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

तेथे काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटारसायकलवर एक व्यक्ती बसलेला आढळला. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने सुरुवातीला नाव व पत्ता सांगितला नाही. अधिक चौकशीनंतर त्याने आपले नाव रोहित राजू माने असल्याचे सांगितले. त्याच्या मोटारसायकलच्या टूल बॉक्समध्ये पिस्तूल असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. यावेळी टूल बॉक्समध्ये गावठी पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी ते जप्त करून आरोपीला अटक केली.

या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत करीत आहेत.

आरोपीचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित राजू माने याच्याविरुद्ध यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये लोणीकंद पोलीस ठाण्यात दरोडा आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई झालेल्या गुन्ह्याचा, कोंढवा पोलीस ठाण्यात घरफोडी व चोरीचा, खडक पोलीस ठाण्यात चोरीचा, तसेच वाघोली पोलीस ठाण्यात गावठी शस्त्र बाळगल्यासंदर्भातील गुन्ह्याचा समावेश आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, भोर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर आणि सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *