ताज्या बातम्या

दानपेट्या खचाखच भरलेले देवस्थान व संस्था शेतकरी, पूरग्रस्त नामशेष झाल्यास मदत करणार का? – अॅड. शंकर चव्हाण

Spread the love
मुंबई/ प्रतिनिधी
महाराष्ट्रात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनतेवर मोठं संकट आलं आहे. लाखो हेक्टरवरील उभी पिकं पाण्याखाली गेली, घरे पडली, जनावरं वाहून गेली आणि अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली. शेतकऱ्यांचा जीवनप्रवास जणू थांबून गेला आहे. सरकारकडून मदतीची अपेक्षा कायम असते; पण या संकटाच्या काळात समाजातील प्रचंड संपत्ती असलेल्या देवस्थान आणि संस्थांची जबाबदारी आहे का, हा प्रश्न आता अधिक ठळकपणे पुढे येतो.
अॅड. शंकर चव्हाण (अधिवक्ता, मा. उच्च न्यायालय, मुंबई) यांनी या गंभीर परिस्थितीवर भाष्य करताना रोखठोक प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, “महाराष्ट्रातील अनेक देवस्थानं आणि धार्मिक संस्था दानपेट्यांनी अक्षरशः खचाखच भरलेल्या आहेत. कोट्यवधी-शेकडो कोटी रुपयांची मालमत्ता, बँक ठेवी, दानधर्मातून मिळणारा पैसा आणि मोठ्या जमिनी या संस्थांकडे आहेत. पण जेव्हा शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त होतो, शेतकरी आत्महत्या करतो, पूरग्रस्त कुटुंबं उघड्यावर येतात, तेव्हा या देवस्थानं मदतीला का येत नाहीत?”
त्यांनी पुढे सांगितलं की, शेतकरी हा समाजाचा पोशिंदा आहे. आपल्या कष्टाच्या कमाईतून तो देवाला दान देतो. मंदिरातील दानपेट्या शेतकऱ्यांच्या अर्पणानेच भरतात. अशावेळी जेव्हा शेतकऱ्यांचा संसार उध्वस्त होतो, त्यांची मुलं उपाशी राहतात, जनावरं मरतात, घरं पडतात, तेव्हा त्या दानपेट्यांतील पैसा त्यांच्या मदतीसाठी वापरला गेला पाहिजे. “दानपेट्यांतील पैसा जर केवळ मंदिरांचा विस्तार, सोनेरी कळस आणि वैभव दाखवण्यासाठीच वापरला जाणार असेल, तर तो धर्माचा अपमान आहे. खरी लोकसेवा म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसणं होय,” असं चव्हाण म्हणाले.
चव्हाण यांनी सरकारलाही आवाहन केले की, प्रचंड संपत्ती असलेल्या देवस्थान आणि संस्थांच्या मिळकतीतून काही हिस्सा शेतकरी व पूरग्रस्तांसाठी वापरण्याची सक्ती केली जावी. शासनाकडून मिळणारी मदत अपुरी असते. अशा वेळी सामाजिक व धार्मिक संस्थांनी पुढे येणं अत्यावश्यक आहे.
ते म्हणाले की, “शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्याला संकटात सोडणं म्हणजे संपूर्ण समाजाला मृत्यूपथाला ढकलणं होय. देवस्थानं जर लोकांच्या श्रद्धेवर जगत असतील, तर त्या श्रद्धेचा मान राखणं, शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे.”
अॅड. चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे समाजात एक गंभीर चर्चा सुरू झाली आहे. दानपेट्यांत खचाखच पैसा असणाऱ्या मोठ्या देवस्थानं आणि संस्थांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उभं राहावं, ही जनतेचीही ठाम अपेक्षा आहे. कारण शेतकरी जगला तरच समाज आणि धर्म दोन्ही जगतील, हा संदेश त्यांच्या शब्दांतून स्पष्ट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *